धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:30 IST2024-12-08T12:29:16+5:302024-12-08T12:30:30+5:30

वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही.

More than 100 Latur farmers get notice from Maharashtra Waqf Board, Claim on 300 acre land is waqf property | धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा

धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा

लातूर - राज्यातील लातूर जिल्ह्यात वक्फ बोर्ड आणि शेतकरी यांच्यातील जमीन संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील १०० हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवल्या आहेत. आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर वक्फ बोर्डाला कब्जा करायचा आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

काय आहे प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ बोर्डाने लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीस गेले आहे. 

या प्रकरणातील पीडित शेतकरी तुकाराम कनवटे यांनी सांगितले की, या जमिनीवर पिढ्यानुपिढ्या आम्ही शेती करत आहोत. या वक्फच्या मालमत्ता नाहीत. महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. आतापर्यंत यावर २ सुनावणी पार पडल्या आहेत तर पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे असं त्यांनी माहिती दिली. या प्रकारामुळे लातूरमधील अहमदपूरच्या तळेगाव येथील शेतकरी सध्या चिंतेत आहे. 

काँग्रेस सरकारमुळे असे प्रकार - भाजपा

दरम्यान, हे तत्कालीन काँग्रेस सरकारचं पाप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशात वक्फ सुधारणा कायदा आणणार आहेत. वक्फ बोर्डाला अतिरिक्त अधिकार देण्याचे पाप काँग्रेसने केले आणि त्याचे परिणाम देश भोगत आहेत असं भाजपा आमदार योगेश सागर यांनी म्हटलं. लातूरच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून जमिनीसाठी नोटीस मिळाल्यावर त्यांनी हे भाष्य केले. 

वक्फ बोर्ड काय आहे?

वक्फचा अर्थ आहे अल्लाहच्या नावे...म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाही. वक्फ बोर्ड एक सर्वेक्षक असतो, तो कोणती संपत्ती वक्फची आहे कोणती नाही हे ठरवतो. साधारण ३ आधारे हे ठरवले जाते. जर कुणी त्यांची संपत्ती वक्फच्या नावे केली असेल, जर कुणी मुस्लीम अथवा मुस्लीम संस्थेची जमीन दिर्घकाळापासून वापरली जात असेल आणि सर्व्हेवर जमीन वक्फची संपत्ती असल्याचं सिद्ध होईल. वक्फ बोर्ड मुस्लीम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलं गेले होते. या जमिनींचा गैरवापर आणि त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवण्यासाठी तयार करण्यात आली होती.

वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे कब्रिस्तान तिथं कुंपण घालते, तिथे त्याच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करते. वक्फ बोर्ड या कबरी आणि आजूबाजूच्या जमिनींचा ताबा घेते.  वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही.ताबा घेण्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्याने वक्फ बोर्ड याचा फायदा घेते. जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्याविरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावे लागते. वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्याविरोधात आला तरी त्याला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही
 

Web Title: More than 100 Latur farmers get notice from Maharashtra Waqf Board, Claim on 300 acre land is waqf property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.