मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 14:57 IST2023-12-03T14:54:03+5:302023-12-03T14:57:56+5:30
विधानसभा निवडणूक निकालाचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये आज मतमोजणी सुरू आहे. यातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसकडून भाजपला कडवी झुंज दिली जाईल, अशी आशा देशभरातील विरोधी पक्षांना होती. मात्र विरोधकांची ही आशा फोल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या निकालाचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निवडणूक निकालावरही भाष्य केलं आहे.
"आजचा निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने झुकत असल्याचं आतापर्यंतच्या कलांवरून दिसत आहे," असं शरद पवार म्हणाले. तसंच या निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होईल का, या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, "विधानसभा निवडणूक निकालांचा इंडिया आघाडीवर काही विपरित परिमाण होईल, असं मला वाटत नाही. आम्ही मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहोत. या बैठकीत निकालाचं विश्लेषण केलं जाईल. तज्ज्ञांकडून या निकालाचे बारकावे जाणून घेतले जातील आणि त्यानंतरही याबाबत आम्ही आमचं मत मांडू."
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
विधानसभा निवडणुकांबाबत पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "मी निवडणुकांदरम्यान या राज्यांमध्ये गेलो नसल्याने तिथं नेमकी काय स्थिती होती, याची कल्पना नाही. मंगळवारी आमची दिल्लीत बैठक झाल्यानंतरच याबाबत आणखी स्पष्टपणे बोलताना येईल."
ईव्हीएम आणि मोदी मॅजिकबद्दल काय म्हणाले शरद पवार?
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "निकालापूर्वी काही लोकांनी आमच्याकडे ईव्हीएमबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र याबाबत माझ्याकडे कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. अशा स्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी काही मत व्यक्त करणं, योग्य नाही," असं पवार म्हणाले. भाजपच्या विजयामुळे पंतप्रधान मोदी यांची जादू अद्याप कायम असल्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, "अद्याप मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच आपण यावर मत तयार करू शकतो. त्यासाठी ६ वाजेपर्यंत वाट पाहावी लागले."