मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 17:46 IST2025-10-19T17:44:31+5:302025-10-19T17:46:38+5:30
मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच!

मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
"मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात ८० किंवा १०० मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे, वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ यादीत आहेत. देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री झाले आहेत. म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत", असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
आयोगाविरोधात मोर्चाला काँग्रेसचे समर्थन
ते पुढे म्हणाले, "मतदारांची वाढलेली संख्या अनाकलनीय आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केलेले असताना निवडणूक आयोगाकडून जी उत्तरे दिली जात आहेत, ती समाधानकारक नाहीत व पटणारीही नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कटपुतलीच्या बाहुल्यासारखी आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पाहता त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली जात आहे. तसा निर्णय झाला तर काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करेल."
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण
"पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.