मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 08:23 AM2024-02-25T08:23:39+5:302024-02-25T08:23:51+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

MNS will not join grand alliance; Raj Thackeray finally made it clear | मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली :  महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. मनसे महायुतीत जाणार या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर कुणी कुणाबरोबर दिसल्याने आघाडी किंवा युतीचे ठरत नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांना शनिवारी पूर्णविराम दिला. 

राज म्हणाले, ‘विधान भवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नव्हते. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर वागतोय असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार.’ 

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने मनसेकडून चाचपणी केली जात आहे. 

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर आले होते.  शुक्रवारी कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले.
अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात. मात्र, त्यांच्यासमोर जे राजकारण सुरू आहे, ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, असे राज म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या मराठा - ओबीसी वादाबाबत ते म्हणाले, ‘राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या, या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील, तर हे वाद कोणीतरी घडवतोय’, असा आरोपही 
त्यांनी केला.

महाराजांचे नाव न घेणाऱ्या पवारांना तुतारी
 शरद पवार यांच्यावर राज यांनी थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर केले. 
  पवारांनी महाराष्ट्रातील महापुरुष जातीपातींमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला? असा टोला राज यांनी लगावला.

गायकवाडांनी हे पाऊल का उचलले, ते शोधा
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराकडे लक्ष वेधले असता राज म्हणाले की, ‘गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईल.’

राष्ट्रीय पक्षांना देणे-घेणे नाही
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना याबाबत काही देणे-घेणे नाही. त्यासाठी राष्ट्रीय नव्हे, प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात, असे राज म्हणाले.

Web Title: MNS will not join grand alliance; Raj Thackeray finally made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.