संजय राऊत यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे मनसेत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:10 IST2025-10-14T15:09:14+5:302025-10-14T15:10:30+5:30
‘तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा आहे. ‘मविआ’तील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलासुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज यांची भूमिका आहे.

संजय राऊत यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे मनसेत नाराजी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेससोबत युतीची इच्छा आहे, अशी माहिती उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावर मनसे नेत्यांनी नाराजी व्यक्त करत राऊत यांनी जाहीर केलेली भूमिका खोडून काढली. ‘आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील. बाकी कोणी नाही,’ असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आणि काही वेळातच संजय राऊत यांनी सावध पवित्रा घेत राज यांना स्पष्टीकरण दिले.
राज ठाकरे ‘मविआ’त येण्यास इच्छुक आहेत का? त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली का? या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी सांगितले, ‘तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा आहे. ‘मविआ’तील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलासुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज यांची भूमिका आहे. या वक्तव्यानंतर मनसेमध्ये नाराजी पसरली. तेव्हा राऊत यांनी राज यांना वैयक्तिक मेसेज करून स्पष्टीकरण दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राऊत यांच्या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, मनसेने अद्याप कोणताही प्रस्ताव काँग्रेसला पाठवला नाही. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. तर बाळा नांदगावकर म्हणाले, अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही, त्यामुळे ही चर्चा निरर्थक आहे.
पक्ष प्रवक्त्यांची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक घेतली. यात मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटीबाबत मार्गदर्शन केले. या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रित केले आहे, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.