Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:34 IST2024-10-02T12:27:26+5:302024-10-02T12:34:37+5:30
Raj Thackeray And Mahatma Gandhi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे.

Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं मोलाचं योगदान आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे. महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारलं आहे.
"आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं, हे सध्या सुरू आहे. आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत."
आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 2, 2024
त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण… pic.twitter.com/nwWNK1RwJL
"काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा."
"गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन" असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.