नाशिक - कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची वज्रमूठ तोडू शकत नाही. मराठी माणसांची एकजुटीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढत आहेत. मुंबईच नाही तर नाशिक, कल्याण डोंबिवली, ठाणे येथेही आम्ही एकत्रित लढू असं विधान करत खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्रित येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्येही एकत्रित लढणार आहोत. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक महापालिकांमध्ये एकत्र लढणार आहोत. याबाबत आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद आहे. कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ तोडू शकत नाही. महाराष्ट्र दुर्बळ, कमकुवत व्हावा यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती मराठी माणसाला, महाराष्ट्राला नामर्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मराठी माणसांनी स्वाभिमानाच्या प्रश्नावर लढण्यासाठी उठू नये असा त्यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नरेंद्र मोदी ७५ वर्षाचे होतील, देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली. स्वातंत्र्यानंतर देशात सुई धागाही बनत नव्हता आज हा देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. काही नेत्यांना वाटते २०१४ साली देश स्वातंत्र्य झाला पण देश २०१४ नंतर खड्ड्यात गेला. प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काही योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षात भाजपाचे इतकेच योगदान आहे की, हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. भारतवर्ष हा देश श्रद्धाळू, धार्मिक होता पण भाजपाने राजकीय स्वार्थासाठी टोकाचे धर्मांध केले. ही धर्मांधता देशात धार्मिक फूट पाडतेय, ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, काय खायचे, काय प्यायचे आणि तलवार कशी उपसायची हे मराठी माणसांना माहिती आहे. ही तलवार दोन ठाकरे बंधूंनी उपसली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे हे उसळून येईल. जिल्हा परिषदा आम्ही ताकदीने लढवणार आहोत. शहरातील महापालिका विषय संपलेला आहे. त्यावर फार चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. महापालिकेत काय करायचे हे आमचे ठरलेले आहे असं राऊतांनी म्हटलं.