"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:58 IST2025-12-16T14:57:38+5:302025-12-16T14:58:03+5:30
कार्यकर्ते, पदाधिकारी युतीच्या घोषणेची वाट पाहतायेत तसे आम्हीही वाट पाहतोय. पुढील १-२ दिवसांत नक्कीच तुम्हाला बातमी मिळेल. सध्या बैठकीत चर्चा सुरू आहे. अशी माहिती नांदगावकरांनी दिली.

"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
मुंबई - हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला कुणी सांगू नये. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व तुम्हाला शिकवले, त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला कुणी हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाव न घेता भाजपा आणि शिंदेसेनेला टोला लगावला आहे. मुंबईत ठिकठिकाणी निनावी बॅनर लावून ठाकरे बंधू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसांचे काय होणार असं या बॅनरवर मजकूर छापण्यात आला आहे. त्यावरून नांदगावकरांनी भाष्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला कुणी सांगू नये. ज्या बाळासाहेबांचं हिंदुत्वसाठी ६ वर्ष मतदानाचा हक्का काढून घेतला होता. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिले. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व तुम्हाला शिकवले. जेव्हा मशीद पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीच ठाम भूमिका मांडली होती. त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला कुणी हिंदुत्व शिकवू नये असं त्यांनी सांगितले.
मनसे-शिवसेना युतीची लवकरच घोषणा
आज आमची बैठक झाली. बैठकीत काही गोष्टी ठरल्या आहेत. पुन्हा आणखी एका बैठकीसाठी बसणार आहोत. कार्यकर्ते, पदाधिकारी युतीच्या घोषणेची वाट पाहतायेत तसे आम्हीही वाट पाहतोय. पुढील १-२ दिवसांत नक्कीच तुम्हाला बातमी मिळेल. सध्या बैठकीत चर्चा सुरू आहे. विषय तडीस लागत नाही तोपर्यंत कशावरही भाष्य करणे योग्य नाही असं सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे-शिवसेना युतीवर माध्यमांना माहिती दिली.
दरम्यान, वर्षा गायकवाड या खासदार आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत आणि आमची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक पक्षाचा वेगळा अजेंडा असतो. ध्येय धोरणे वेगळी असतात. काँग्रेसबाबत आमचा कसलाही विषय नाही. सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित येण्याची वाटचाल सुरू आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत असंही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट करत काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.