मनसेची रणनीती! राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपा-मनसे युतीबाबत सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:20 IST2021-12-03T15:14:36+5:302021-12-03T15:20:54+5:30
मनसेच्या नेत्यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

मनसेची रणनीती! राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपा-मनसे युतीबाबत सूतोवाच
मुंबई – भाजपा-मनसे युतीबाबत सध्या चर्चा सुरु झाली नाही. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवल्या आहेत. पुढे काय होईल सांगता येत नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो साहेब घेतील. परंतु सध्यातरी मनसेची एकला चलो रे भूमिका आहे. लवकर जी काही चांगली बातमी यायची ती येईल असे सूतोवाच मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) यांनी केले आहे.
मनसेच्या नेत्यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं राज ठाकरे(Raj Thackeray) दौरा करणार आहेत. मराठवाड्यात संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र पुणे, कोकणात रत्नागिरी, विदर्भात नागपूर, अमरावती याठिकाणी दौरा होणार आहे. सध्या १४ डिसेंबरला संभाजीनगर तर १६ डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. मुंबईत नेत्यांचा मेळावा होईल. या दौऱ्यावर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जातील असंही मनसेकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
भाजप-मनसे युती होणार?
शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप एकाकी पडला. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपला एका साथीदाराची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेची मदत मिळाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपला मनसेसोबत थेट युती करण्यात अडचणी आहेत. मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरते. त्यामुळे भाजप-मनसेची जाहीर युती होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र पडद्याआडून दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रखरपणे घेतली आहे. पक्षाच्या झेंड्याचा रंगसुद्धा बदलण्यात आला आहे.
अद्याप चर्चा नाही – देवेंद्र फडणवीस
अलीकडेच फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती. त्यानंतर भाजपा-मनसे युतीबाबत चर्चेला उधाण आलं त्यावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तरी मी जाईल. राज ठाकरे प्रभावी नेते आहे. त्यांनी नवीन घरं बांधलं तेव्हा मी स्वत: त्यांना अभिनंदनांचा फोन केला. तेव्हा राज ठाकरेंनी कोविड काळामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र अनेक मित्रांना मी घरी बोलावलं. तुम्ही आणि वहिनी जेवायला या असं निमंत्रण त्यांनी दिलं. तेव्हा आम्ही जेवायला गेलो. राज ठाकरेंकडे खूप माहिती असते. राज ठाकरेंना प्रत्येक विषयाचं ज्ञान चांगले आहे. वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मानल्या. आम्ही युती करण्यासाठी गेलो नव्हतो. भाजपा-मनसे युतीबाबत काहीही चर्चा नाही. सध्यातरी भाजपा स्वबळावर जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे.