'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:00 IST2025-08-24T18:45:54+5:302025-08-24T19:00:59+5:30
Laxman Hake On Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Laxman Hake On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात २९ ऑगस्टला रोजी मुंबईत मोर्चा निघणार आहे. आज याबाबत जरांगे यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. हाके यांनी गंभीर आरोप केले.
"मनोज जरांगे यांचा मोर्चा हा सरकार पुरस्कृत आहे, मनोज जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना १० ते १५ लाख रुपये देतात',असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे, नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत.यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले.
यावेळी हाके यांनी राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांच्यावर टीका केली. मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवले आहे, अशी टीका हाकेंनी केली.
गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
"आम्ही शांतपणे मुंबईला जाणार आणि शांततेत मराठा आरक्षण घेणार, समाजावर आलेले संकट मोडून काढणार. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
"बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात , जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचे ते करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले. आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ?, असेही जरांगे पाटील म्हणाले.