'अलमट्टी'च्या प्रश्नावर दिल्लीत ४ ऑगस्टला आमदार, खासदारांची बैठक; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांसोबत करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:07 IST2025-07-31T18:05:47+5:302025-07-31T18:07:15+5:30
हजारो हेक्टर क्षेत्र बाधित

'अलमट्टी'च्या प्रश्नावर दिल्लीत ४ ऑगस्टला आमदार, खासदारांची बैठक; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांसोबत करणार चर्चा
सांगली : कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार आहे. उंचीविरोधात दोन्ही जिल्ह्यातून जोरदार विरोध होत असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदारांना बोलावले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बुधवारी दिले.
सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढला आहे. याबाबत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी मागील महिन्यात मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना उद्भवणारा धोका व त्याविरुद्ध जनतेची तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदारांनी केंद्राकडे भूमिका मांडावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदार यांना भेटीची वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय जलशक्तीमंत्री पाटील यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रमशक्ती भवन, नवी दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील राज्यातील जनतेची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लेखी पत्राद्वारे जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी केले आहे.
हजारो हेक्टर क्षेत्र बाधित
या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. अनेक गावांना स्थलांतर करावे लागते. परिणामी दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत आहे. कोट्यवधीचे नुकसान या महापुरामुळे होत आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो. त्यामुळे सांगलीसह कोल्हापूरला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे.