आमदार नरेंद्र मेहता यांनी मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणेंना वाढदिवसाचा केक भरवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 22:28 IST2025-08-02T22:27:27+5:302025-08-02T22:28:49+5:30
अमराठी वरून एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी जाधवांच्या उपस्थितीत केक खाल्ला.

आमदार नरेंद्र मेहता यांनी मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणेंना वाढदिवसाचा केक भरवला
मीरारोड मध्ये एका मारवाडी व्यापाऱ्यास मराठी भाषेवरून झालेल्या बोलाचालीत मारहाण करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करायला लावणारे, अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा हेतू स्पष्ट तर मराठी मोर्चाच्या हेतू बद्दल संशय व्यक्त करणारे मीरा भाईंदर भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. मराठी माणूस आणि मराठी भाषा वरून मनसेच्या रडार वर असलेले मेहता यांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसैनिकांच्या देखतच राणेंना वाढदिवसाचा केक भरवला. मराठी वरून मनसे - मेहता यांच्यातील वाद केक वरून पुन्हा चर्चेत आला आहे.
मीरारोडच्या जोधपूर स्वीटच्या मारवाडी मालक सोबत मराठी भाषे वरून वाद होऊन मनसैनिकांनी त्याला मारले होते. त्याविरोधात आ. मेहतांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश शेअर करत निषेध केला होता. त्यानंतर शहरातील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून त्यात मराठी माणसांना अद्दल घडवण्याची भाषा केली. त्याविरोधात मराठी एकीकरण समिती, सकल मराठा समाज, मनसे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बविआ आदी पक्ष, संस्था एकत्र आल्या. मराठी माणसांचा मोर्चा दडपून काढण्यासाठी पोलिसांनी नोटीसा, धरपकड व मोठा बंदोबस्त लावला. मात्र पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी माणसांचा मोर्चा निघाला.
ह्या सर्व घटनेत सुरवाती पासून आ. मेहतांनी व्यापाऱ्यांची बाजू घेत मनसेवर टीकेची झोड उठवली होती. व्यापाऱ्यास मारहाणीची एफआयआर आम्ही करायला लावली. परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा हेतू व भूमिका स्पष्ट होती, दुटप्पी नव्हती. मराठी मोर्चा बद्दल बोलताना मात्र, ह्यांच्या भूमिकेत दिखाना कुछ और व करना कुछ और असे दिसून येते असे सांगत मी व्यापाऱ्यांच्या मागून नाही तर समोरून सोबत आहे. त्यांनी जनहितामध्ये आंदोलन झाले त्याचा अभिमान आहे अशी वक्तव्ये आ. मेहतांनी केली होती.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, आ. मेहतांवर टीकेची झोड उठवली. जेवढे आहेत तेवढे मराठी माणूस तुला पुरून उरू. मराठी माणसांच्या नादी लागलात तर तुमचे राजकारणात संपवल्या शिवाय राहणार नाही असा जाहीर इशारा मेहतांना दिला होता.
व्यापाऱ्यांचा मोर्चा पालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन राजकारण करत त्यांना फूस व बळ दिल्याने त्यांनी मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करत अद्दल घडवण्याची भाषा मागे भाजपाचे आ. मेहतांचा हात असल्याचे आरोप मनसे, मराठी एकीकरण समिती आदींनी केले होते. मोर्चात मेहतांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली गेली होती.
मीरारोड मधून सुरु झालेल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सर्वत्र वातावरण तापले. त्यातच मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एस. के. स्टोन येथील सभागृहातील कार्यक्रमात आ. नरेंद्र मेहता हे राणे यांच्या बाजूलाच उभे होते. त्यांनी राणे यांना केक भरवून भाषण देखील केले. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत आणि उपस्थित मनसे पदाधिकारी, मनसैनिक व अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यां समक्षच जाहीरपणे हा मेहता - राणे यांचा केक सोहळा रंगला.