धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका; पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 19:50 IST2021-11-16T19:48:55+5:302021-11-16T19:50:08+5:30
समाज माध्यमांवर धार्मिक वा जातीय भावना भडकवणाऱ्या तसेच तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका आणि अशा पोस्ट करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या

धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका; पोलिसांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - समाज माध्यमांवर धार्मिक वा जातीय भावना भडकवणाऱ्या तसेच तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका आणि अशा पोस्ट करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने दोन्ही शहरातील नागरिकांना केले आहे .
सायबर गुन्हे शाखेने या बाबतचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करताना म्हटले आहे कि , देशातील व महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मिक भावना भडकविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोटया बातम्या प्रसारित करणारे ऑडिओ, व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित होत आहेत.
सामाजिक शांतता भंग करणारे, समाजविघातक पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित करणे कायदयाने गुन्हा आहे. सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० मधील तरुतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. व्हॉट्सएप वापरणारे सर्व नागरिक विशेषत: ग्रुप ऍडमिन यांनी आपल्या ग्रुप मध्ये अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ प्रसारित होणार नाही. याची विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
धार्मिक भावना भडकवणाऱ्या व जातीय तेढ निर्माण होतील अशा बातम्या सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्या पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ करताना कोणीही आढळून आल्यास त्याची माहिती त्वरीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षास देण्यात यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.