"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:34 IST2025-02-02T16:31:52+5:302025-02-02T16:34:41+5:30
मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे विधान केल्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.

"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान
Yogesh Kadam on Sanjay Shirsat: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक हालचाली सुरुच आहेत. उद्धव ठाकरेंच्या दारूण पराभवानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत समावेश करण्यात येत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये समेट घडवून आणण्यासंदर्भात विधान केल्यानंतर जोरदार राजकीय चर्चा सुरु झालीय. मात्र आता संजय शिरसाट काय म्हणातात याला महत्त्व नाहीये असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे. पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेन, असं विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. एका मुलाखतीदरम्यान शिरसाट यांनी केलेल्या या विधानाचे आता पडसाद उमटत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनेही संजय शिरसाट यांच्या विधानावर भूमिका स्पष्ट केली. संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्त्व नाही, असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.
पक्षाचे सगळे अधिकार एकनाथ शिंदेंकडे - योगेश कदम
"पक्षाची भूमिका एकनाथ शिंदे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच दिले आहेत. ते दुसऱ्या कोणालाही नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीमध्ये महत्त्व नाही. कारण त्यांचे ते वैयक्तिक मत आहे," असं मंत्री योगेश कदम म्हणाले.
तारा जुळल्या तर हरकत नाही - संजय शिरसाट
"दोन शिवसेना झाल्या याचं फार दु:ख होतं. मला आजही हे आवडत नाही. आजही माझ्या मनाला यातना होतात. ठाकरे गटातील नेता किंवा पदाधिकारी भेटतात त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहे. मात्र, मनामध्ये जे अंतर पडलं आहे, तो त्या पक्षात, मी या पक्षात असं जे झालं आहे हे आवडत नाही. दोन्ही नेत्यांना आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेन. पण दोघांची तार जुळली पाहिजे. त्या दोघांची तार जुळत असेल तर त्यासाठी माझा काहीही आक्षेप नाही. ज्यांचं कधी तोंड पाहण्याची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.