अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:38 IST2025-02-10T13:19:34+5:302025-02-10T13:38:33+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चांवर सविस्तर खुलासा केला आहे.

अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं!
Uday Samant: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असून त्यांनी ही नाराजी व्यक्त करणारं पत्र प्रधान सचिवांना लिहिल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केला आहे. "मी उद्योगमंत्री म्हणून ४ फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिलं होतं. मंत्री म्हणून मला प्रधान सचिवांकडून कसं काम अपेक्षित आहे, याबाबत सूचना करणारं ते पत्र होतं. या पत्रात मी कसलीही नाराजी व्यक्त केली नव्हती. माझी नाराजी असण्याचं काहीच कारण नाही. प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेताना त्याची कल्पना मला द्यावी, असं मी पत्रातून सांगितलं आहे. कारण हे निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती पत्रकार परिषदेतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्या निर्णयांची माहिती असणं आवश्यक आहे," अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.
उदय सामंत पुढे म्हणाले की, "सत्तेचं विकेंद्रीकरण जसं राजकारणात महत्त्वाचं आहे तसं अधिकारांच्या बाबतही महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी मंत्र्यांकडे सहीसाठी आल्या पाहिजेत, असं असू नये, अशी भूमिका मी पत्रातून मांडली आहे. मी प्रधान सचिवांवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही, कारण मी कॅबिनेट मंत्री आहे आणि ते माझ्या हाताखाली काम करतात. मी २०१३ मध्ये ९ खात्यांचा राज्यमंत्री होतो. त्यानंतर म्हाडाच्या अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि आता उद्योगमंत्री आहे. त्यामुळे प्रधान सचिव म्हणून त्यांचा मान-सन्मान, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार मला माहीत आहेत. फक्त प्रधान सचिवांनी उद्योग विभाग सहजरीत्या सांभाळला पाहिजे, त्याचा फायदा लोकांना आणि उद्योजकांना झाला पाहिजे, यासाठी मी ते पत्र लिहिलं आहे," असं स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं आहे.
दरम्यान, 'मी ४ तारखेला पत्र लिहिल्यानंतर यावर ५ तारखेला पत्रकार परिषद घ्यावी लागणार, हे मला माहीत होतं. उलट हे पत्र आज १० तारखेला म्हणजे सहा दिवस उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचलं," असा टोलाही सामंत यांनी लगावला.