Uday Samant : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात; सुरक्षा अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 22:26 IST2021-12-01T22:26:21+5:302021-12-01T22:26:56+5:30
Uday Samant : उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (Special security unit) गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी त्यांच्या गाडीला धडकली.

Uday Samant : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात; सुरक्षा अधिकारी जखमी
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant car accident) यांच्या गाडीला रात्री ८ वाजता अपघात झाला. सुरक्षा रक्षकांची गाडी मागील बाजूने त्यांच्या गाडीवर आदळली. त्यात मंत्री सामंत सुरक्षित असून, त्यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत.
मंत्री सामंत मुंबईमधील एका कार्यक्रमासाठी जात होते. ते गाडीमध्ये एकटेच होते. त्यांच्या मागे त्यांच्या विशेष सुरक्षा पथकाचा (Special security unit) ताफा होता. मंत्री सामंत यांच्या मागच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती गाडी सामंत यांच्या गाडीवर आदळली.
या अपघातात मंत्री सामंत यांना किरकोळ मुका मार लागला. त्यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले असून, त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा सर्व खर्च आपणच करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.
मी सुखरुप : सामंत
गाडीला छोटासा अपघात झाला. मी सुखरुप आहे. माझ्या सुरक्षा अधिकाऱ्याला दुखापत झाली असून, मी रुग्णालयातच आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री सामंत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.