मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले अन् म्हणाले; "होय, अभिनेता किरण मानेचा बोलविता धनी मीच"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:15 PM2022-01-20T20:15:11+5:302022-01-20T20:15:32+5:30

मी विचार करुनच भूमिका घेतो आणि एकदा भूमिका घेतली तर मागे हटत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Minister Jitendra Awhad Targeted BJP Chitra Wagh over Comment on actor Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले अन् म्हणाले; "होय, अभिनेता किरण मानेचा बोलविता धनी मीच"

मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले अन् म्हणाले; "होय, अभिनेता किरण मानेचा बोलविता धनी मीच"

googlenewsNext

मुंबई – मुलगी झाली हो मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलेले अभिनेता किरण माने यांच्यावरुन वाद चांगलाच रंगला आहे. गुरुवारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरी किरण माने, स्टार प्रवाह मालिकेचे कंटेट हेड सतीश राजवाडे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह इतर मराठी कलाकारांची बैठक पार पडली. या बैठकीत किरण माने वादावर कुठलाही तोडगा निघाला नाही परंतु हे प्रकरण संपवण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळाले. मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसच्या लोकांना घेऊन राजवाडे पुन्हा आव्हाडांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका गरीब शेतकरी कुटुंबातून किरण माने मुंबईसारख्या शहरात लढायला आलेत. मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. एका स्त्रीशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप मालिकेतील एकीने केली परंतु इतर स्त्रियांनी त्यांची बाजू घेतली. या वादाला इतर कुठलाही रंग न लावता प्रॉडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाह वाहिनीने एकत्रित बसून तोडगा काढावा. हा तोडगा काढताना कुणावरही अन्याय होणार नाही ही माझी भूमिका असेल असं त्यांनी सांगितले.

...अन् जितेंद्र आव्हाड संतापले

काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी किरण माने यांचा बोलविता धनी कोण? असा सवाल केला होता. पत्रकारांनी हा प्रश्न आव्हाडांना विचारला तेव्हा जितेंद्र आव्हाड संतापले अन् म्हणाले, होय चित्रा वाघ यांना सांगा किरण माने यांचा बोलविता धनी मीच आहे. एखाद्या मालिकेत काय घडतं हे आम्हाला कसं समजू शकतं असा सवालही आव्हाडांनी विचारला आहे.

तसेच मुलगी झाली हो ही मालिका चांगली आहे. किरण माने यांची भूमिकाही लोकप्रिय आहे. ही मालिका बंद होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आणखी एकदा बैठक घ्यावी लागेल. मी या वादात फक्त एका गरिबाची बाजू घेतोय. हे भांडण मिटवा आणि एकत्र येत चांगली मालिका सुरु राहू द्या. किरण माने यांच्यावरील टीका पाहून मी या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला. मी विचार करुनच भूमिका घेतो आणि एकदा भूमिका घेतली तर मागे हटत नाही. माझ्या राजकीय आयुष्यात असं कधीच घडलं नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Minister Jitendra Awhad Targeted BJP Chitra Wagh over Comment on actor Kiran Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.