मंत्री धनंजय मुंडेंचा २४८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 07:44 IST2025-02-05T07:43:46+5:302025-02-05T07:44:42+5:30
थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश डावलून कृषिमंत्री असताना मुंडे यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी केली.

मंत्री धनंजय मुंडेंचा २४८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांचा घणाघाती आरोप
मुंबई : नियमबाह्य पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवून कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी सुमारे २४८ कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश डावलून कृषिमंत्री असताना मुंडे यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी केली. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्याच्या बॅगा या पाच वस्तू बाजारभावाच्या तुलनेत जादा दराने खरेदी केल्या. जुलै २०२३ ते २०२४ या एका वर्षात हा घोटाळा झाला, असा दावाही दमानिया यांनी केला आहे.
नॅनो डीएपी व नॅनो युरिया या दोन वस्तूंची खरेदी दुपटीपेक्षा जास्त किमतीने केल्यामुळे सुमारे ८८ कोटींचा घोटाळा झाला आहे. मेटाल्डेहाइड हे पीआयए कंपनीचे उत्पादन आहे. कॉटन स्टोअरेज बॅगही अधिक दराने खरेदी केल्या. ३४२ कोटींच्या टेंडरमधून १६० कोटी रुपये जास्त देण्यात आले. हे पैसे गेले कुठे? डीबीटी योजनेचे पाच लाखांहून अधिक लाभार्थी होते. त्याचे बजेट ठरले होते; परंतु, उत्पादनांच्या किमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
भगवान गडावर पुरावे दाखविणार
मुंडे एकच वर्ष कृषिमंत्री पदावर होते. त्यांनी इतका घोटाळा केला असेल तर त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची गरज आहे का? हे सर्व पुरावे भगवान गडावर घेऊन नम्रपणे दाखविणार आहे. त्यांना दिलेला पाठिंबा मागे घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची विनंती करणार आहे, असे दमानिया म्हणाल्या.
आधी खरेदी, नंतर निविदा
कृषीमंत्र्यांनी नॅनो डीएपीची ५०० मि.लि.ची २६१ रुपयांची बाटली ५९० रुपयांना खरेदी केली. त्याची निविदा ३० मार्चला काढली; परंतु पैसे त्याआधीच १६ मार्चला दिले होते.
२ २ हजार ४५० रुपयांचे फवारणी यंत्र ३ हजार ४२५ रुपयांना खरेदी केले. त्याचेही पैसे २८ मार्चला दिले; पण निविदा ५ एप्रिलला काढली, असा दावा दमानिया यांनी केला.
गोगलगायीसाठी वापरले जाणारे ८१७3 रुपये प्रतिकिलोचे प्रतिबंधक औषध १ हजार २७५ रुपये दराने खरेदी केले. १६ मार्चला पैसे दिले आणि निविदा ९ एप्रिलला काढली. हा गैख्यवहार लपविण्यासाठी मागील तारखेची पत्रे देण्यात आली, असेही दमानिया यांनी सांगितले.
अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार : मुंडे
कृषी विभागाने केलेली कृषी साहित्याची खरेदी नियमाला धरूनच होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच ही खरेदी केलेली आहे. त्यामुळे अंजली दमानिया करीत असलेले आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठीच आहेत. ५९ दिवसांपासून खोट्या आरोपांद्वारे माझी बदनामी केली जात आहे. त्यामुळे दमानिया यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
दमानिया यांनी युरिया व एमएपी नॅनो खतासंदर्भात केलेले आरोप, फवारणी पंप खरेदीसंदर्भात केलेले आरोप पूर्णतः चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
'मुंडेंना बडतर्फ करा'
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट धनंजय मुंडेंना तत्काळ बडतर्फ करावे, तसेच मंत्र्यापासून ते सचिवापर्यंत सर्वांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंडेंच्या पाठिंब्यानेच कराड टोळीची दादागिरी वाढली आहे. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही दानवे म्हणाले.
'मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवा'
छत्रपती संभाजीनगर : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी पुराव्यानिशी आरोप केले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.