किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

By समीर देशपांडे | Updated: March 7, 2025 12:54 IST2025-03-07T12:53:45+5:302025-03-07T12:54:21+5:30

सुट्टीतही करावे लागणार काम

Minimum reading, action program for mathematics Government program for students in the state | किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

संग्रहित छाया

समीर देशपांडे

कोल्हापूर : राज्यातील दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज-वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘नास’ आणि ‘असर’ यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरांवरील विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत सरकारने निपुण भारतअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६/२०२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी हा कृती कार्यक्रम घेण्यात येईल.

शिक्षकांनी हे करायचे आहे

शिक्षकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी. त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वत:चा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखायचा आहे. ३० जून पर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५ टक्के विद्यार्थी अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील, याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावयाची आहे.

सुट्टीतही करावे लागणार काम

विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये प्राप्त करावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्तचा वेळ शिक्षकांनी वापरावा. याच कालावधीत मे महिन्याचीही सुट्टीही येत असल्याने सुट्टीतही अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबत संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी नियोजन करावे अशाही सुचना आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही बजावले आहे.

Web Title: Minimum reading, action program for mathematics Government program for students in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.