लाखो वाहनांच्या तपासणीचा भार दोघांवर : आरटीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:39 IST2018-10-09T15:32:30+5:302018-10-09T15:39:14+5:30
योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत.

लाखो वाहनांच्या तपासणीचा भार दोघांवर : आरटीओ
पुणे : योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सोमवार (दि. ८) पासून सुरू करण्यात आली. मात्र, लाखो वाहनांसाठी दोन मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश असलेल्या एकाच पथकावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने कार्यालयावर ही वेळ आली असून मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत. वाहनांची तपासणी काटेकोरपणे न केल्याने काही दिवसांपुर्वी शासनाने ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक १३ निरीक्षकांचा समावेश होता. याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परिवहन विभागाने वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे आरटीओकडून सोमवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन वाहन निरीक्षकांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
पुणे जिल्ह्यात सर्वप्रकारच्या एकुण वाहनांची संख्या ३६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने माल व प्रवासी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. पण जिल्ह्यातील या वाहनांची संख्या विचारात घेता त्यांच्या तपासणीसाठी अधिक पथकांची गरज आहे. पण मनुष्यबळाअभावी केवळ एकच पथक नेमण्यात आले आहे. दिवे येथील टेस्ट ट्रॅक, दैनंदिन परवानाचे काम यांसह अन्य कामांसाठी केवळ ३७ निरीक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे तपासणी मोहिमेसाठी आणखी निरीक्षक दिल्यास दैनंदिन कामकाज आणखी कोलमडू शकते. त्यामुळे एकच पथक नेमण्याची वेळ कार्यालयावर आली आहे. संपुर्ण शहरात फिरून रस्त्यावर धावण्यास योग्य नसलेल्या वाहनांचा शोध घेणे या पथकासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे दि. २३ आॅक्टोबरपर्यंत हे पथक किती वाहनांची तपासणी करणार, हा प्रश्नच आहे.