Vaijapur Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आश्रमात संगीताताई पवार या कीर्तनकार महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी परप्रांतीय असून, त्यांनी या आरोपींनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार संगीताताई पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. त्या या आश्रमातच राहायच्या. दरम्यान, हत्या झाली त्या दिवशी त्या बाहेर झोपल्या होत्या. तिथेच हल्लेखोरांनी त्यांचं डोकं दगडाने ठेचून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली होती. अखेर आता या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
संगीताताई पवार हत्ये प्रकरणी अटक आरोपींचं परप्रांतीय कनेक्शन समोर आलं असून, यापेकी एका आरोपीला वैजापूर येथून, तर दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.