म्हाडाच्या पुणे मंडळातील ४१८६ घरांच्या लॉटरीला २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; ११ डिसेंबरला लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:33 IST2025-10-28T18:33:00+5:302025-10-28T18:33:00+5:30
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली

म्हाडाच्या पुणे मंडळातील ४१८६ घरांच्या लॉटरीला २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; ११ डिसेंबरला लॉटरी
मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४ हजार १८६ घरांच्या लॉटरीकरिता अर्ज सादर करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्राप्त अर्जांची लॉटरी ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.
लॉटरी चार घटकांमध्ये विभागणी
- म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका
- १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका
- २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे.
एजंट म्हणून नेमलेले नाही
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली. यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. - राहुल साकोरे, मुख्य अधिकारी