'त्या' लॉटरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट! विजेत्याला घर बदलून दिले, आधीच्या विजेत्यासोबतचा करारही रद्द केला, तरी...; म्हाडाचा मोठा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 11:52 IST2026-02-15T11:52:13+5:302026-02-15T11:52:55+5:30
MHADA Pune Lottery 2026 Viral Video: म्हाडा पुणे मंडळाचा पिंपरी वाघेरे योजनेत मोठा गोंधळ. सदनिका बी/९०३ चे दुहेरी वाटप झाले. म्हाडाने चूक सुधारली तरी विजेतीने ताबा नाकारला, अखेर बँकेने घर जप्त करून लिलावात काढले. वाचा सविस्तर.

'त्या' लॉटरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट! विजेत्याला घर बदलून दिले, आधीच्या विजेत्यासोबतचा करारही रद्द केला, तरी...; म्हाडाचा मोठा खुलासा...
पुणे/पिंपरी: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पिंपरी वाघेरे योजनेत प्रशासकीय चुकीमुळे एकाच सदनिकेचे दुहेरी वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रिक्त नसतानाही सदनिका क्र. बी/९०३ ही चुकून रिक्त यादीत समाविष्ट झाल्याने हा पेच निर्माण झाला. यावरून पिडीत कुटुंबाने नुकत्याच झालेल्या पुणे सोडतीवेळी आपली व्यथा मांडली होती. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. यावर म्हाडाचा आता खुलासा आला आहे.
रेश्मा नितीन घोरपडे यांना २०१९ च्या सोडतीत आधी ए/१७०३ ही सदनिका मिळाली होती. यासाठी त्यांना सदनिकेची किंमत रु. ५५,६२,५००/- चा भरणा करण्यासाठी मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र देण्यात आले होते. घोरपडे यांनी ऑक्टोबर, २०२० मध्ये ही सदनिका व मजला बदलून मिळाला म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना बदलून ९०३ ही सदनिका देण्यात आली. म्हाडाकडून सर्व व्यवहार झाल्यानंतर घोरपडे हे त्या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यामध्ये दिनेश चौधरी हे राहत होते. म्हाडाने नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतून ही सदनिका चौधरी यांनाही वितरित केली होती. त्यांचा व्यवहारही पूर्ण झाला होता व ताबापत्र मिळताच ते तिथे रहायला गेले होते.
म्हाडाकडून चूक दुरुस्त, पण विजेती अडून बसली
घोरपडे यांनी तक्रार केल्यानंतर म्हाडाच्या दुहेरी वाटप झाल्याचे लक्षात आले. यानंतर म्हाडा प्रशासनाने सुनावणी घेतली. यावेळी घोरपडे यांना रिक्त सदनिकांपैकी एक निवड करण्याचा पर्याय सुचविण्यात आला. परंतू, ते जी मिळालीय तीच द्यावी अशी मागणी करत अडून बसले. यामुळे पुढे झालेल्या सुनावणीवेळी चौधरी यांनी सामंजस्याची भूमिका घेत सदनिका बदलून घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना दुसरी सदनिका (बी/११०३) देण्यात आली. यासाठी चौधरींसोबतचे आधीचे दस्त रद्द करण्यात आले. अशा प्रकारे बी/९०३ ही सदनिका पुन्हा श्रीमती घोरपडे यांच्यासाठी रिक्त झाली. प्रशासनाने त्यांना वारंवार ताबा घेण्याबाबत ई-मेल आणि पत्रे पाठवली, परंतु त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत ताबा घेण्यास नकार दिला.
बँकेची जप्ती आणि लिलाव
दरम्यान, श्रीमती घोरपडे यांनी या घरासाठी कॅनरा बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाचे हप्ते भरले नाहीत. परिणामी, बँकेने SARFAESI ACT २००२ अंतर्गत सदनिकेचा ताबा घेतला. बँकेने या घराचा लिलाव केला असून, आता ही सदनिका श्रीमती पूनम अग्रवाल यांना वितरित करण्यात आली आहे. म्हाडाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी श्रीमती अग्रवाल यांच्या नावे नियमितीकरण पत्रही दिले आहे.
म्हाडाची भूमिका
दुहेरी वितरणाची चूक वेळेत दुरुस्त करून घोरपडे यांना त्यांचे घर परत देण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, त्यांच्या असहकार्यामुळे आणि कर्ज थकबाकीमुळे बँकेने कायदेशीर लिलावाची जाहिरात काढून कारवाई केली. यामध्ये आता मंडळाची कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी उरलेली नाही, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
घोरपडेंचे आरोप काय होते... इथे क्लिक करा...