दीड वर्षात ३० हजार घरे दिली, दोन वर्षात एक लाख घरे उभारणार; शिंदेंची म्हाडाबाबत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:39 IST2025-01-29T18:38:29+5:302025-01-29T18:39:00+5:30
Mhada Lottery 2024, Eknath Shinde: मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

दीड वर्षात ३० हजार घरे दिली, दोन वर्षात एक लाख घरे उभारणार; शिंदेंची म्हाडाबाबत घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत. रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत.