पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:21 IST2025-10-05T08:20:20+5:302025-10-05T08:21:27+5:30
Maharashtra Government Jobs: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, १० हजार ३०९ जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्र प्रदान

पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकरभरती अत्यंत पारदर्शक व गतिशील पद्धतीने करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. अनुकंपा तत्त्वावरील ५,१८७ आणि एमपीएससीमार्फत नियुक्त ५,१२२ अशा एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना नोकरीची नियुक्तीची प्रमाणपत्रे देण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आज राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित ८० टक्के प्रकरणात नोकऱ्या दिलेल्या आहेत. उर्वरित २० टक्के नोकऱ्या चार महिन्यांत देण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. एमपीएससीमार्फत होणारी नोकर भरती बरेचदा रेंगाळते त्यात तीन-चार वर्षे निघून जातात; मात्र यापुढे ही भरती वेगवान पद्धतीने केली जाईल. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यासाठी अभ्यास केला आहे. वेगवान भरतीची पद्धत येत्या काही महिन्यांत निश्चित केली जाईल आणि पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कुठेही लाच देऊ नका
सरकारी नोकरी देताना आम्ही पारदर्शकता आणली आहे, कोणालाही लाच कुठेही द्यावी लागत नाही. आपण जनतेचे सेवेकरी आहोत, ही भावना बाळगून काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आशिष शेलार, जयकुमार रावल, दादा भुसे, आ. परिणय फुके, मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.
चांदा ते बांदा जाण्याची तयारी ठेवा
सरकारने तुम्हाला नियुक्ती दिली आहे. आता विशिष्ट गाव शहरातच बदली झाली पाहिजे, असा आग्रह धरू नका.
त्यासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांकडे चकरा मारू नका. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
प्रशासनात गतिमानता, व्ही. राधा यांची प्रशंसा
सामान्य प्रशासन विभागामध्ये अनेक चांगले बदल घडवून आणल्याबद्दल अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
विभागाच्या कारभारात त्यांनी गतिमानता आणली पारदर्शकता आणली अनेक वर्षांपासून तेच ते असलेले सेवा प्रवेश नियम सुधारले, विभागाच्या कामकाजाला बळकटी आणली, असे ते म्हणाले.
शहीद प्रकाश मोरे यांच्या कन्येला मिळाली नियुक्ती
२००८ मधील मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का हिला अनुकंपा तत्त्वावर आज नोकरी मिळाली. वर्ग ब अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.
मात्र, त्यासाठी तिने एमपीएससीमार्फत सेवेत यायला हवे, ही अट एमपीएससीने आमच्या विनंतीनुसार मान्य केली आणि तिला नोकरी देणे शक्य झाले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.