मुतखड्यावरील औषधाच्या किमतीत तिप्पट वाढ; नागरिकांमधे नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:50 IST2018-10-06T23:49:53+5:302018-10-06T23:50:17+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मुतखड्यावरील औषधाच्या किमतीत तिप्पट वाढ; नागरिकांमधे नाराजी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या आयुर्वेदिक औषधीच्या ६० गोळ्यांच्या एका बाटलीची किंमत सुरुवातीला २८० रुपये एवढी होती़ त्यामध्ये आॅक्टोबरच्या सुरुवातीला तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे़
विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. सी. एन. खोब्रागडे आणि डॉ. अमोल शिरफुले यांनी दहा वर्षाच्या संशोधनानंतर हे औषध साकारले आहे. नांदेडात श्रीनगर भागात एका मेडिकलमध्ये हे डिसोकॅल औषध विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. परंतु महिनाभरात किंमत ८५० रुपये झाली आहे. सुरुवातीला आलेली औषधी ही डॉक्टर सॅम्पल होती़ त्यामुळे त्याचे दर कमी होते़ आता जळगावच्या कंपनीकडून प्रत्यक्ष उत्पादन करण्यात येते. कच्चा माल, वाहतूक, जीएसटी यामुळे दरात वाढ करण्यात आल्याचे संशोधक डॉ़ खोब्रागडे यांनी सांगितले.
औषधाला राज्यभरातून मागणी
डिसोकॅल या औषधाला राज्यभरातून मागणी येत आहे़ परंतु त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही औषधी बाजारात आणण्यात येणार आहे़ प्रत्येक टप्प्याला केवळ १०० बाटल्याच मिळत असल्याचे विक्रेत्याचे म्हणणे आहे़