कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच उपलब्ध होणार वैद्यकीय उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:50 IST2019-01-29T18:42:55+5:302019-01-29T18:50:26+5:30
राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि कच्चे कैदी असलेल्या बंदीजनांना दिलासा देणारी एक बाब आहे. विविध विकाराबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाणार आहे.

कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच उपलब्ध होणार वैद्यकीय उपकरणे
- जमीर काझी
मुंबई - राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि कच्चे कैदी असलेल्या बंदीजनांना दिलासा देणारी एक बाब आहे. विविध विकाराबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाणार आहे. त्यामुळे निदानात होणाऱ्या विलंबामुळे कैदी दगावणे, प्रकृती बिघाडाच्या प्रकाराला आळा बसणार आहे."
वैद्यकीय उपकरणाच्या उपलब्धतेमुळे कैद्यांना तपासणीसाठी कारागृहातून ने-आण करणे, त्यांची सुरक्षा आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळाचा प्रश्न निकालात लागणार आहे. बंद्यांच्या वैद्यकीय सोई सुविधेत वाढ करण्यासाठी तब्बल २० लाख ८८ हजार रुपये किंमतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरच विविध स्तरावरील कारागृहात ही उपकरणे उपलब्ध केली जातील, असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तळोजा कारागृहातील कैदी जोरावर सिंहला झालेल्या मारहाण व त्याच्यावरील उपचारावरील दिरंगाईबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याने कारागृह प्रशासनाकडून सोईसुविधाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
राज्यातील बहुतांश जेलमध्ये क्षमतेच्या जवळपास दिडपट कैदी आहेत. त्यामध्ये सिद्ध दोष बंद्यापेक्षा न्यायाधीन कैद्यांची संख्या अधिक आहे. या सर्वांना तपासण्यासाठी जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी असतो, त्याच्याकडून कैद्यावर प्राथमिक उपचार केला जातो. मात्र त्याठिकाणी प्राथमिक तपसाणीसाठी आवश्यक असणारी यंत्रे,उपकरणाचा अभाव आहे. त्यामुळे एकतर कैद्यावरील आजारावर तातडीने निदान केले जात नाही. किंवा त्याला अन्य शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी न्यावे लागते.त्यामुळे कैद्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. त्यामुळे आता पल्स ऑक्सिमिटर, डिजीटल स्टेथोस्कोप, डिजीटल मायक्रोस्कोप,ईसीजी मशीन, स्ट्रेचर , रिशूसेशन किट , मल्टीपल मॉनिटर, पेशंट ट्रॉली, ड्रेसिंग ट्रॉली आॅपरेशन टेबल,आदी साहित्याची खरेदी करणार आहे.
महाराष्ट्रात एकुण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ,ब, क व ड या चार स्तरावर ४५ असे एकुण ५४ कारागृह आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असलीतरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १३८५ महिला कैदी आहेत.
जेलमधील बंदी क्षमता २३९४२, प्रत्यक्ष बंदीची संख्या ३१२१८