Admission: एमबीबीएस, बीडीएससाठी ९९७ विद्यार्थ्यांना जागा वाटप; प्रवेशाची आज अंतिम मुदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:28 IST2025-11-17T12:25:41+5:302025-11-17T12:28:21+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी ९९७ विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे शनिवारी वाटप करण्यात आले.

Admission: एमबीबीएस, बीडीएससाठी ९९७ विद्यार्थ्यांना जागा वाटप; प्रवेशाची आज अंतिम मुदत!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी ९९७ विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे शनिवारी वाटप करण्यात आले आहे. त्यांना आता सोमवार, १७ नोव्हेंबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीअखेर ८,०४८ जागा, तर बीडीएसच्या २,२१० जागा भरल्या गेल्या आहेत. आता सीईटी सेलने स्ट्रे व्हॅकन्सी फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली. यामध्ये आता एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या एकूण ९९७ विद्यार्थ्यांना विविध कॉलेजांतील जागांचे वाटप करण्यात आले.
न्यायालयाच्या निर्णयावर प्रवेश अवलंबून
नागपूर उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेतील निकालावर या फेरीत कॉलेजांचे वाटप केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अवलंबून असतील, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यामुळे या फेरीत कॉलेजांचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
अद्यापही ३८७ जागा रिक्त
यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये ४,९३६ जागा आहेत, तर खासगी कॉलेजांमध्ये ३,४९९ जागा आहेत. यातील आतापर्यंत सरकारी कॉलेजांतील ४,८९९ जांगावर, तर खासगी कॉलेजांतील ३,१४९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सरकारी कॉलेजांमध्ये ३७ जागांवर, तर खासगी कॉलेजांमध्ये ३५० जागा रिक्त आहेत. राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा ८,४३५, तर बीडीएसच्या २,७१८ जागा उपलब्ध आहेत. यंदा पहिल्या फेरीत ६,८४८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर, दुसऱ्या फेरीत सीईटी सेलने १,४११ जागांचे वाटप विद्यार्थ्यांना केले होते.