महापौर, आम्हाला पाणी द्या, हक्काचे पाणी पळवू नका : पुण्यात महापौर निवासासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 06:17 PM2018-10-28T18:17:38+5:302018-10-28T18:18:54+5:30

रेव्ह्येन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला.

Mayor, give us water : Movement in front of mayor residence in Pune | महापौर, आम्हाला पाणी द्या, हक्काचे पाणी पळवू नका : पुण्यात महापौर निवासासमोर आंदोलन

महापौर, आम्हाला पाणी द्या, हक्काचे पाणी पळवू नका : पुण्यात महापौर निवासासमोर आंदोलन

Next

पुणे : रेव्ह्येन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला. महापौरांनी त्यांना रविवारी सायंकाळी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. ते त्यांनी लेखी मागितल्यामुळे पुन्हा थोडा गोंधळ झाला.

                 सलग १५ दिवस पाण्याचा त्रास सहन करत असल्याची या महिलांची तक्रार होती. वारंवार आश्वासन देऊनही पाणी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याच तक्रारीची दखल घेत खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी  त्यांना रविवारी सकाळी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे रविवारी ही बैठक झाली. खासदार अनिल शिरोळे आयुक्त सौरव राव, स्थानिक नगरसेवक निलिमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम बैठकीला उपस्थित होते. 

                 बैठक सुरू होण्यापुर्वीच रेव्हेन्यू कॉलनीतील महिला तसेच पुरूषांनाही महापौर निवासस्थानी ठाण मांडले होते. हातात बादली व स्टिलचा ग्लास घेऊन ते आले होते. त्यांनी घोषणा सुरू केल्या. हक्काचे पाणी पळवू नका, महापौर, आम्हाला पाणी द्या. उद्याची आंघोळ महापौरांच्या निवासस्थानी अशा घोषणा ते देत होते. बादली वाजवत ते देत असलेल्या या घोषणांच्या पार्श्वभूमीवरच महापौर टिळक यांचे तिथे आगमन झाले. त्यामुळे अधिक जोरात घोषणा सुरू झाल्या. महापौर आत गेल्यानंतर बैठक सुरू झाली. ती तब्बल दोन तास चालली. तेवढा वेळ सर्व आंदोलक बसून होते. आपल्याला कोणी पाणीही विचारले नाही हे लक्षात आल्यानंतर तर त्यांचा संताप अनावर झाला. महापौर बंगल्यावर नागरिकांना प्यायला पाणीही देत नाही का म्हणून त्यांच्यातील वयोवृद्धांनी ओरड सुरू केली. अखेर बऱ्याच वेळाने एकजण पाण्याचा कॅन घेऊन आला. पण त्याला वेळ लागला म्हणून ते पाणी आम्ही कोणीच पिणार नाही अशी भुमिका आंदोलकांनी घेतली. बैठक लांबल्यामुळेही आंदोलक चिडले. त्यांच्यातील महिलांनी नगरसेवकांना फोन करून त्वरीत बाहेर या, नाहीतर आम्ही आत येऊ असा इशारा दिला.त्यामुळे ज्योत्स्ना एकबोटे व निलिमा खाडे बाहेर आल्या व त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. बैठक संपले की सगळेच बाहेर येऊन तुमच्याशी बोलतील असे त्यांनी सांगितले.

                 त्याप्रमाणे बैठक संपल्यांवर महापौर टिळक यांनी सर्व आंदोलकांना त्यांच्यासाठी आजच (रविवारी) सायंकाळी पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. कशामुळे अडचण झाली होती याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पाईपलाईन फुटली तर ती दुरूस्त करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ जातो, त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तसे झाल्यामुळेच तुम्हाला पाणी मिळाले नाही. मात्र आता एसएनडीटी जवळच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जाईल. खासदार शिरोळे म्हणाले, महापौर व आयुक्त यांच्यावर संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे,ते पुर्ण होईल याची मला खात्री आहे. दोघांच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी त्यांना हे म्हणणे लेखी द्यावे अशी मागणी केली. त्यामुळे पुन्हा थोडा गोंधळ झाला. पण अखेरीस सर्वांनीच लेखी आश्वासनांवर स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Mayor, give us water : Movement in front of mayor residence in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.