Matheran: पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन झाली अवघी ११६ वर्षांची
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 12:03 IST2023-04-18T12:03:18+5:302023-04-18T12:03:43+5:30
Matheran: मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभोय यांनी १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रॅक बनवून मिनी ट्रेन सुरू केली तो दिवस होता १५ एप्रिलचा.

Matheran: पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन झाली अवघी ११६ वर्षांची
- विजय मांडे
कर्जत : मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभोय यांनी १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रॅक बनवून मिनी ट्रेन सुरू केली तो दिवस होता १५ एप्रिलचा. नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर चालविल्या गेलेल्या पहिल्या मिनी ट्रेनला आता ११६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्या काळात मिनी ट्रेनने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत.
१९७२ मध्ये तीन वर्षे चाललेल्या रेल्वे संपात ही ट्रेन बंद होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी माथेरान -नेरळ घाट रस्ता श्रमदान करून तयार केला आणि आज हाच एकमेव रस्ता माथेरान घाट रस्ता म्हणून ओळखला जातो. तसेच अलीकडे अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्ग वाहून गेला होता.
१८५७ मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी शोध लावल्यावर रामबागमार्गे माथेरानमध्ये ब्रिटिश अधिकारी येऊ लागले.
थंडहवेचे ठिकाण म्हणून शोधलेल्या या ठिकाणी नंतरच्या काळात सरकारी कार्यालये सुरू झाली.
१९०५ मध्ये माथेरान गिरीस्थान नगरपालिका, पोस्ट ऑफिस, टेलिग्राम केंद्र ही ब्रिटिशांची देणं होत. त्याकाळी मुंबईहून पनवेल, उलवे, चौक असे पुढे रामबागमार्गे चालत आणि घोड्यावर किंवा डोलीत बसून माथेरानला ब्रिटिश अधिकारी आणि मुंबईमधील धनिक समजले जाणारे पारसी लोक यायचे.
मिनी ट्रेनची देणगी कोणाची?
१९०० च्या दरम्यान मुंबईचे नगरपाल असलेले सर आदमजी पीरभोय आणि त्यांचा मुलगा हुसेन अब्दुल पीरभोय हे माथेरानला जाण्यासाठी नेरळला आले असता अंधार झाला होता आणि त्यामुळे त्यांना माथेरानला जाण्यासाठी डोली उपलब्ध झाली नाही.
तेव्हा पीरभोय पिता-पुत्रांनी माथेरान येथे जाईन तर ट्रेन घेऊनच जाईन, असा निर्णय घेतला आणि पीरभोय पिता-पुत्रांनी नेरळ ते माथेरान या अत्यंत अवघड घाटातून रेल्वे नेण्यासाठी १९०१ मध्ये सुरुवात केली आणि १५ एप्रिल १९०७ रोजी नेरळ-माथेरान या २१ किलोमीटर नॅरोगेज मार्गांवर मिनी ट्रेनची सेवा सुरू झाली. या कामाकरिता त्यांनी १६ लाख रुपये स्वतः खर्च केले होते.
स्थित्यंतरे काय झाली...
वाफेच्या इंजिनवर चालणारी मिनीट्रेन डिझेलवर चालविली जाते
पूर्वी मिनीट्रेनच्या प्रवासात दोन बोगीमध्ये ब्रेक पोर्टर असायचे. आज एअर ब्रेक सेवा सुरू झाली
आता वातानुकूलित सेवादेखील मिनी ट्रेनमध्ये आहे.
मिनी ट्रेन जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळविण्यासाठी सज्ज आहे.
घोडा किंवा डोलीत बसून प्रवास
१८५४ मध्ये मुंबई-पुणे या मार्गावर रेल्वे सुरू झाली आणि १८५६ ला ती ट्रेन नेरळ, खोपोलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे नेरळ येथे रेल्वे ट्रेन असल्याने नेरळहून माथेरान असा प्रवास सुरू झाला होता. घोडा किंवा डोलीत बसून माथेरानला जाण्याचा मार्ग १८५७ मध्ये विकसित झाला होता.