लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:50 IST2025-11-13T07:49:45+5:302025-11-13T07:50:17+5:30
Marriage News: अकोल्यातील एका तरुणाने परवा, शनिवारी चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही!, या तरुणाने दिलेले हे निवेदनवजा पत्र पाहून पवार व त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले.

लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
अकोला - ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, त्यांची वये निघून चालली आहेत, ही गंभीर सामाजिक समस्या बहुतेकांना चांगलीच माहीत आहे. तथापि, स्थानिक पातळीवर ही समस्या सुटण्याची आशा संपल्याने असे तरुण आता थेट देशपातळीवरील नेत्यांना साकडे घालू लागले आहेत. अकोल्यातील एका तरुणाने परवा, शनिवारी (८ नोव्हेंबर) चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही!
अकोल्यात शनिवारी पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक जण बोलले. काहींनी निवेदने दिली. त्यापैकी एक निवेदनवजा पत्र पाहून पवार व त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले. हे पत्र त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखविले. तिघांमध्ये या पत्रावरून चर्चा झाली.
एकाकीपणा आता असह्य झाला !
स्वत:चा पत्ता आणि मोबाइल नंबरसह शरद पवार यांना विनंती करताना हा तरुण म्हणताे, ‘माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो.’
हा तरुण पत्राचा शेवट, मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशा शब्दांत करतो. सामान्य माणूस अजूनही शरद पवारांकडे किती आशेने पाहतो, याचे हे निदर्शक ठरावे. हे पत्र अस्वस्थ करणारे आहे. अपुरे शिक्षण, बेरोजगारी व गरिबीच्या चक्रात पिळून निघणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना या पत्राने समोर आणल्या आहेत.
- साेलापूरच्या नवरदेव मोर्चाची आठवण : डिसेंबर २०२२ मध्ये सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हाेता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले २५ पेक्षा अधिक नवरदेव नवरी मिळावी अशी मागणी करीत निघाले होते. लग्नासाठी योग्य मुलींची स्थळे येत नसल्याने हे आंदोलन झाले होते.
- ग्रामीण भागातील समाजकारण, अर्थकारण पूर्णपणे बदलल्यामुळे शिक्षण, नोकरी, छोकरी, सुखी संसार ही तीन-चार दशकांपूर्वीचा तरुणांचा जीवनक्रम आता पूर्ण बदलला आहे. मुलामुलींचे लिंग गुणोत्तर बदलले.
- मुलींची संख्या कमी झाली. जोडीदाराकडून मुलींच्या अपेक्षाही वाढल्या. शहरी व नोकरदार मुलगा हवासा वाटू लागला. परिणामी, नोकरी नसलेले तरुण बिनलग्नाचे राहू लागले. विवाहसंस्था अडचणीत आली. नवी सामाजिक विषमता रूजू लागली.