मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’
By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2025 09:03 IST2025-09-30T09:03:31+5:302025-09-30T09:03:48+5:30
सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’
राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साेलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत खरीप हंगामात मका, सोयाबीन, उडीद, तूर, मूग ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. पुरामुळे शेतकऱ्यांचा हंगाम पाण्यात गेला आहेच, त्याचबरोबर उत्पादन कमी होऊन तेलबिया व कडधान्याचा तुटवडा जाणवणार असून त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसणार आहेत.
‘ऐश्वर्या कोलम’ही कडाडणार
विदर्भातील पिकांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गडचिरोलीमध्ये भाताचे ‘ऐश्वर्या कोलम’ वाण मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोल्हापुरात या तांदळाला ग्राहकांची पसंती जास्त असल्याने आगामी काळात तो कडाडण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तवली जात आहे.
मराठवाडा, सोलापूरमधील खरीप पिकांचे नुकसान पाहता त्याचा कडधान्यांसह खाद्यतेलाच्या दरावर भविष्यात परिणाम होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भात पिकाला फटका बसल्याने तांदळाचे दरही वाढू शकतात.
सदानंद कोरगावकर, कडधान्य व्यापारी, कोल्हापूर.
जिल्हानिहाय खरिपातील पीक क्षेत्र, हेक्टर
जिल्हा मका सोयाबीन तूर उडीद मूग
सोलापूर ५३,७६४ ९१,४४८ ९९,००० ८०,५१७ ९३०
धाराशिव ६,५२३ ४,५९,९४३ ३१,०३६ २५,६८३ ५,२७७
लातूर २,२०१ ४,९२,१४४ ६३,८९५ २९,००८ ४,५८१