का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:57 IST2025-09-26T06:56:50+5:302025-09-26T06:57:27+5:30
मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होतो आहे. १२ सप्टेंबरपासून विभागात रात्रीतून पाऊस झाला आहे.

का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होत चालला आहे. २०२० पासून आजवर तीन वेळा ओला दुष्काळाचा सामना कमी-अधिक प्रमाणात विभागाला करावा लागला आहे. मागील पाच वर्षांत मराठवाड्यातील सुमारे ४२ हून अधिक तालुक्यांतील खरीप हंगाम ढगफुटीने वाया गेला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १२ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे २४ लाख हेक्टरचे नुकसान झाले असून ७५ टक्के पंचनामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील दहा दिवसांत रात्रीतून पाऊस पडल्यामुळे जीवित व पशुधनहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होतो आहे. १२ सप्टेंबरपासून विभागात रात्रीतून पाऊस झाला आहे. हिमालयाच्या बाजूला तापमान वाढले आहे. त्यामुळे ढगात पाण्याची धारणक्षमता वाढली आहे. त्याला थंडावा मिळाला, की तेथे ढगफुटीसारखा पाऊस होतो.
रात्रीतून पाऊस होण्यामागे ‘डाऊनरफ्ट’ हे कारण आहे. दिवसा हवेतील आर्द्रता या काळात वाढल्याने बाष्पीभवन वेगाने होऊन ढग जमा होतात. व रात्रीतून डाऊनरफ्ट होऊन ढगफुटीसारखा पाऊस होतो आहे. प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ
‘हवामान’चे एक्स-बॅण्ड रडार कागदावरच?
हवामानाचा अचूक अंदाज, माहिती मिळत नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी जागा निश्चित केली. मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.