मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:04 IST2026-01-01T07:03:33+5:302026-01-01T07:04:47+5:30
शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही...

मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
दुर्गेश सोनार -
मुंबई : मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनावर अवलंबून राहाणे पुरेसे नाही, ते योग्यही नाही. हे मराठी माणसाचे स्वत:चे काम आहे, ते आपले आपणच केले पाहिजे' अशी स्पष्ट भुमिका सातारा येथे आजपासून सुरु होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियिजित अध्यक्ष, ख्यातनाम कादंबरीकार, 'पानीपत'कार विश्वास पाटील यांनी मांडली आहे.
शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही-
संमेलनाच्या पूर्वसंध्येला ' लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत 'साहित्य संस्कृती जगवण्याचे काम हे समाजाचे असते, लोकांनी फक्त शासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून स्वत: पळ काढणे योग्य नाही' असे ते म्हणाले.
इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा देखण्या, पोषाखी, आधुनिक चेहेऱ्याच्या असतात हे खरे, पण त्या चकचकाटाला न भुलता खरेखुरे ज्ञान कुठल्या शाळेत मिळते ते पाहणे महत्वाचे आहे, असा आग्रही सल्लाही विश्वास पाटील यांनी दिला.
'मराठी भाषा टिकवण्याची ही जबाबदारी समाजाला कशी पार पाडता येईल, यावर काही उपाययोजना दिसतात का?'- या प्रश्नावर ते म्हणाले, 'मला जे सुचते, ते मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. मराठी ही लोकांनीच वाचवली पाहिजे, ती लोकांचीच चळवळ बनली पाहिजे; हेच माझ्या भाषणाचे मुख्य सूत्र असेल!'