‘मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:50 IST2026-01-04T19:49:25+5:302026-01-04T19:50:03+5:30
Marathi Sahitya Sammelan: “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे आणि आपली जबाबदारी आहे. भाषा संपली, तर अस्तित्वही संपेल.” याचबरोबर हिंदी भाषेची कोणतीही सक्ती केली जाणार नसून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान-सन्मान आणि दरारा अधिक वाढवला जाईल, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान
सातारा - “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे आणि आपली जबाबदारी आहे. भाषा संपली, तर अस्तित्वही संपेल.” याचबरोबर हिंदी भाषेची कोणतीही सक्ती केली जाणार नसून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान-सन्मान आणि दरारा अधिक वाढवला जाईल, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव ठरलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. भाषणाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजमाता येसूबाई, सातारा शहराचे निर्माते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. मराठ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या साताऱ्याच्या भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
हे संमेलन म्हणजे केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, विचारस्वातंत्र्याचा आणि सांस्कृतिक आत्मविश्वासाचा उत्सव असल्याचे त्यांनी नमूद केले. “सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झालेली पवित्र भूमी आहे. अशा भूमीत साहित्याचा महाकुंभ भरतो, हे सर्व मराठी माणसांसाठी गौरवाचे आहे,” असे ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. “ हे बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मायमराठीला हा बहुमान मिळाला, हे मी कधीही विसरू शकणार नाही,” असे भावनिक शब्द त्यांनी वापरले.
मराठी भाषेसाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यात अमरावतीच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना, मुंबईत १५० कोटींच्या निधीतून भव्य मराठी भाषा भवन, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र, दिल्लीतील जेएनयूमध्ये कुसुमाग्रज अध्यासन केंद्र, जगातील ७५ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना तसेच राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा” ला दिलेली मान्यता यांचा त्यात समावेश आहे.
यापूर्वी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, साहित्याच्या महत्त्वाची जाणीव ठेवत ही रक्कम वाढवून २ कोटी रुपये करण्यात आली असून, सातारा साहित्य संमेलनासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. “हे उपकार नाहीत, हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मराठी साहित्य टिकवण्यासाठी आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी सरकारकडून पुढील निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. महापालिका व नगरपालिका परिसरात पुस्तक स्टॉलसाठी सवलतीच्या दरात जागा, एसटी स्थानकांवर मराठी पुस्तक स्टॉलसाठी ५० टक्के भाडे सवलत, ग्रंथालय निर्मिती, पुस्तक खरेदी व डिजिटल वाचन सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी तसेच लेखन व प्रकाशन व्यवसायावरील १८ टक्के जीएसटी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी माणूस आज जगभर कर्तृत्व गाजवत असल्याचे सांगत, भाषा जात–धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांना जोडते, असे त्यांनी नमूद केले. “मराठी ही केवळ अर्थार्जनाची भाषा नाही, ती आपली अस्मिता आहे. मराठी जपली, तरच मराठी माणूस टिकेल,” असं आवाहनही त्यांनी केलं.