पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावले; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:38 IST2025-10-01T10:36:10+5:302025-10-01T10:38:20+5:30
निम्म्यापेक्षा अधिक राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ओढावलेल्या संकटात विविध सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावले; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन
मुंबई : निम्म्यापेक्षा अधिक राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ओढावलेल्या संकटात विविध सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आता मराठी कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अनेक सामाजिक संस्था, वैयक्तिक दाते मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेते विजू माने म्हणाले, बळीराजावर याआधी संकट आले तेव्हा कलाकार एकजूट होऊन मदतीला धावून आले होते. आजही मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पूरग्रस्तांसाठी एकत्र आलो आहोत. ‘कलाकार फॉर महाराष्ट्र’ हा कलाकारांचा समूह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून ठामपणे उभा आहे.
शेतकऱ्यांच्या जगण्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवर पावसाने पाणी फिरवले आहे. या अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रावर संकट कोसळले की, आम्ही कलाकार नेहमीच मदतीसाठी धावून गेलो आहोत. आजही मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून पुढे येत आहोत.
सुबोध भावे, अभिनेते
राज्यावरील या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यातून त्यांना सावरता यावे म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबतच ‘कलाकार फॉर महाराष्ट्र’ हा मराठी कलाकारांचा ग्रुप मदतीसाठी पुढे आला आहे.
रामेश्वर नाईक,
मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख