बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:49 IST2023-11-29T16:49:05+5:302023-11-29T16:49:43+5:30
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली.

बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले
बीड - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता. या घटनेला १ महिना पूर्ण होत असून यात आतापर्यंत २६२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात बीडमध्ये जाळपोळ, तोडफोड करणारे एकूण १० गट असल्याचं आढळले. त्यातील ६ गटाचे प्रमुख पकडले गेलेत. इतर ४ गटांचे प्रमुख पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.गटातील इतर सदस्यांना अटक केली आहे. महत्त्वाच्या आरोपींपैकी पप्पू शिंदे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
नंदकुमार ठाकूर म्हणाले की, पप्पू शिंदेकडे चौकशी सुरू असून त्यानेदेखील काही नावे सांगितली आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. कायदेशीरपणे निष्पक्षपाती या घटनेचा संपूर्ण तपास होत आहे. ही घटना गंभीर असून त्याचे गांभीर्य ओळखूनच पोलीस तपास करत आहे. यात कुठल्याही प्रकारे दबाव घेणार नाही. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत त्यांना मुभा देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. तपास अंमलदार या घटनेत योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं.
तसेच पप्पू शिंदे हा बीडमधील सर्वच घटनांमध्ये असल्याचे निष्पन्न झाला आहे. त्याने या घटनेसाठी मुलं गोळा करण्याचे काम केले. पप्पू शिंदेने शुभम ज्वेलर्स इथं सुरुवात करून जमावनिर्मिती केली. त्यामुळे तो या घटनेत महत्त्वाचा आरोपी आहे. पप्पू शिंदे याच्यावर शुभम ज्वेलर्सला धमकावणे, सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकणे यासारख्या गोष्टींसाठी तो जबाबदार आहे. बीड हिंसाचारातील घटनांमध्ये पप्पू शिंदे हा सर्वात महत्त्वाचा आरोपी आहे असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींच्या घरांना, कार्यालयांनाही टार्गेट करण्यात आले. त्याचसोबत शासकीय इमारतीही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादी भवनही जाळले होते. या जाळपोळीत, संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळुंखे यांच्या घराचाही समावेश आहे.