हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:40 IST2025-09-01T15:40:01+5:302025-09-01T15:40:37+5:30
आंदोलकांनी आझाद मैदानावर बसावे, जर अन्यत्र कुठेही दिसले तर ते आमचे आंदोलक नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घ्यावी असं त्यांनी सांगितले.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
मुंबई - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून सरकारकडूनही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. हैदराबाद गॅझेटबाबत कायद्याच्या चौकटीत राहून काय तोडगा काढता येईल त्यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. महाधिवक्ते या बैठकीला होते, परंतु हायकोर्टात सुनावणी असल्याने त्यांना तिथे जावे लागले. आता कोर्टाने काय निर्देश दिलेत ते पाहू. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊ. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी होती, मात्र विविध ठिकाणी आंदोलक फिरत आहेत. त्यात महिला पत्रकारांवरही काही प्रसंग घडले. कुणी आंदोलन बदनाम करण्याच्या दृष्टीने आले असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार. आंदोलकांनी आझाद मैदानावर बसावे, जर अन्यत्र कुठेही दिसले तर ते आमचे आंदोलक नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घ्यावी असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठवाड्यातील जनतेसाठी हैदराबाद गॅझेटबाबत साधारण मसुदा तयार केला आहे. परंतु तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे त्यामुळे चर्चा सुरू आहे. अजून जरांगे पाटील यांच्यासोबत मसुद्याबाबत कुठलीही चर्चा नाही. जनहित याचिकेमुळे बैठकीला विलंब झाला. हायकोर्टाचे निकालपत्र समोर आले नाही, आंदोलनाबाबत सरकारला काय निर्देश दिलेत, आंदोलकांना काय सूचना दिल्यात ते पाहून यावर भाष्य करता येईल. गॅझेटबाबत अंतिम मसुदा तयार झाला तर तो समोर ठेवता येईल. आतापर्यंत आरक्षणावर जेवढे न्यायनिवाडे झालेत त्याचा विचार तोडगा काढताना केला जात आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, आझाद मैदान वगळता इतरत्र मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांची गर्दी होत आहे. सीएसएमटी स्टेशनवर आंदोलक गर्दी करत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय. आंदोलनाच्या नावाखाली काही जण बाहेरून गोंधळ घालत आहेत. जनतेला वेठीस धरत आहे त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.