मराठा आरक्षण हे ७० वर्षांतील मोठे यश- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:14 IST2019-06-22T02:14:05+5:302019-06-22T02:14:22+5:30
मराठा आरक्षण हा आमचा अजेंडा होता आणि आम्ही तो पूर्ण केल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केला.

मराठा आरक्षण हे ७० वर्षांतील मोठे यश- चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण हा आमचा अजेंडा होता आणि आम्ही तो पूर्ण केल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केला. मराठा आरक्षणावर झालेले शिक्कामोर्तब गेल्या ७० वर्षांतील मोठे यश असल्याचेही पाटील म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेला त्यांनी उत्तर दिले. भाजप सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील २० सदस्यांनी भाषणे केली. पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची पूर्ण काळजी राज्य सरकारने घेतली होती. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने विविध आयोग नेमले, पण हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यास ते अयशस्वी ठरले. मात्र, भाजप सरकारने आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाने खूप चांगले काम केले. राज्य मागास आयोगाचे मोठे योगदान असल्यामुळे मराठा समाज मागास असल्याचे घटनात्मकदृष्ट्या निश्चित झाले. मुस्लिम आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आताचे मुस्लिम हे पूर्वीचे हिंदू होते. सध्या त्यांच्यातील ओबीसी वर्गाला आरक्षण आहे.