Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 06:57 IST2025-08-31T06:55:30+5:302025-08-31T06:57:01+5:30
Maratha Kranti Morcha: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला.

Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय नेते आले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी रात्री भेट घेतली होती, तर शनिवारीही दुपारी त्यांनी जरांगे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी दानवे यांच्या फोनवरून उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटलांसोबत संवाद साधला.
"हॅलो…मी उद्धव ठाकरे बोलतोय. मुंबईत इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आल्याचे पाहून अचंबित झालो. सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून मुंबईत एकवटलेल्या मराठी बांधव आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल", असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
उद्धव ठाकरे व जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे माहीत नाही. आझाद मैदानावर असताना फोन आल्याने दोघांचे बोलणे करून दिले, असे दानवे म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनी आंदोलकांना मदत करण्यासोबतच पाणी, अन्न, शौचालय, अशा सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत.
दोन संघटनांचा पाठिंबा
भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व जय हिंद सेना महाराष्ट्र्र पक्षाचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीचे समर्थन पत्र दिले. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधानाची प्रत जरांगे पाटील यांना भेट दिली.
यांनी घेतली भेट?
शिंदेसेनेचे आमदार हिकमत उढाण (घनसावंगी), उद्धवसेनेचे खा. बंडू जाधव (परभणी), खा. अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई), खा. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.