Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:04 IST2025-09-01T12:03:05+5:302025-09-01T12:04:46+5:30

Maratha Reservation: सुटीचा दिवस असल्याने रविवारी मुंबई आणि परिसरातील अनेक मराठा बांधव आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले.

Maratha Kranti Morcha: Protesters get free food and breakfast on the third day | Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता

Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता

खलील गिरकर
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: सुटीचा दिवस असल्याने रविवारी मुंबई आणि परिसरातील अनेक मराठा बांधव आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले. पहिले दोन दिवस आंदोलकांची जेवणाची काही प्रमाणात आबाळ झाली होती. मात्र, रविवारी आंदोलकांसाठी अनेक संस्था, व्यक्तींनी जेवणाची सोय केली. त्यामुळे रविवारी आंदोलकांची खाण्या-पिण्याची गैरसोय झाली नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात अनेक वाहनांमध्ये जेवण, बिस्कीट, पाणी आणि खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात वाटप सुरू होते. दानशूरतेला जणू उधाण आल्याचे चित्र दिसत होते. अनेक जिल्ह्यांतून ग्रामस्थांनी वर्गणी काढून भाकरी आणि ठेचा पाठवला होता. कोणी पाणी पाठवले होते तर कोणी बिस्कीट आणि भेळ पाठवली होती. त्यामुळे रविवारी जेवण आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यासाठी आंदोलकांना वारंवार आवाहन करण्यात येत होते. 

देहू रोडवरून १२ हजार पाण्याच्या बाटल्या 
देहू रोड येथून लहू पवार आणि त्यांचे सहकारी पाण्याच्या १२ हजार बाटल्या घेऊन आले होते. पुण्यातून हे पाणी घेऊन वाहन मुंबईत आले. सात-आठ जणांनी वर्गणी काढून हा खर्च केला होता. तसेच बीडवरून पंजाब कळासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ हजार भाकऱ्या, ठेचा, लोणचे, कांदा आणि पाणी आणले होते. 

व्हेज पुलाव, बटाटा भाजीचाही पर्याय  
भाकरी आणि ठेचा या पारंपरिक जेवणाला अनेक आंदोलकांनी प्राधान्य दिले होते. भाकरी साधारणतः दोन-तीन दिवस चांगली टिकत असल्याने आंदोलकांसाठी अनेकांनी भाकरी पाठवल्या होत्या. मात्र, ज्यांना भाकरी खायची इच्छा नसेल त्यांच्यासाठी काही ठिकाणी व्हेज पुलाव, चपाती आणि बटाट्याची भाजी हा पर्यायही होता. 

Web Title: Maratha Kranti Morcha: Protesters get free food and breakfast on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.