Maratha Kranti Morcha Live : मराठा क्रांती मोर्चाचा आज जेलभरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 07:12 IST2018-08-01T06:20:28+5:302018-08-01T07:12:29+5:30
सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला.

Maratha Kranti Morcha Live : मराठा क्रांती मोर्चाचा आज जेलभरो
मुंबई : सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला.
काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाचा वणवा पेटलेला आहे. आता ‘मूक मोर्चा’ निघणार नाही. १ आॅगस्टला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन केले होणार असून, मुंबईचे जेलभरो आंदोलन आझाद मैदान येथे होईल. याच काळात परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी खुली बैठक होईल. त्यात ९ आॅगस्टच्या आंदोलनाबाबत घोषणा केली जाईल, असे पोखरकर यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारला इशारा देण्यासाठी जेलभरो आंदोलन होणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल. त्यामुळे पुन्हा उद्रेक होण्याआधी सरकारने योग्य तो निर्णय जाहीर करण्याची गरज पोखरकर यांनी व्यक्त केली. समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले की, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यामध्ये पुकारलेल्या बंददरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय कोणत्याही मागणीवर आता चर्चा होणार नाही.