आत्मसमर्पणासाठी माओवाद्यांनी मागितली १ जानेवारीची मुदत; संयम बाळगण्याची विनंती
By संजय तिपाले | Updated: November 28, 2025 18:06 IST2025-11-28T18:05:13+5:302025-11-28T18:06:45+5:30
महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर नवा प्रस्ताव

आत्मसमर्पणासाठी माओवाद्यांनी मागितली १ जानेवारीची मुदत; संयम बाळगण्याची विनंती
गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी आता १ जानेवारी २०२६ ची मुदत मागितली आहे. प्रवक्ता अनंत याने यासंदर्भात २७ नोव्हेंबरला पत्रक जारी केले असून तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘संयम बाळगा, आत्मसमर्पणाची संधी द्या’, अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत १५ फेब्रुवारीची मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विनाविलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे’, असे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, २७ नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत १ जानेवारी रोजी सर्व जण शस्त्रत्याग करुन मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, गृहमंत्री विजय शर्मा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र पाठविले आहे.
सुरक्षित वातावरणात पुनर्वसन प्रक्रिया राबवावी
अनंत याने म्हटले की, या प्रक्रियेपर्यंत तिन्ही राज्यांनी सुरक्षादलांच्या कारवाया थांबवाव्यात, कारण सुरू असलेल्या मोहिमेमुळे विखुरलेल्या माओवादी घटकांशी संपर्क साधण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘आम्ही तुकड्यात नव्हे तर मोठ्या संख्येने, संगठित रीतीने शस्त्रे सोडू इच्छितो. सरकार पुनर्वसनाची प्रक्रिया सुरक्षित वातावरणात राबवेल, अशी अपेक्षा आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले.
छत्तीसगड सरकारचा प्रतिसाद; महाराष्ट्र व मध्यप्रदेशकडून अद्याप प्रतीक्षा
छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी १०-१५ दिवसांत शरणागतीची प्रक्रिया शक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याबाबत प्रतिसाद देताना माओवादी प्रवक्त्याने ही वेळ मर्यादा अपुरी असल्याचे नमूद केले असले तरी सरकार संवादासाठी तयार असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मात्र,महाराष्ट्र व मध्य प्रदेशकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद न आल्याचे खेदाने आम्ही नमूद करतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.
‘पीएलजीए’ सप्ताह न पाळण्याचे आवाहन
प्रवक्ता अनंत याने पीएलजीए सप्ताह न साजरा करण्याचा निर्णयही पत्रकात स्पष्ट केले आहे. भावी शस्त्रसमर्पणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहावे, एकत्र निर्णय घ्यावा व व्यक्तिगत शरणागती टाळावी, असेही निर्देश देण्यात आले. यापूर्वी शरणागती स्वीकारलेल्या सोनू उर्फ भूपती व सतीश यांनी या वाटाघाटीत मध्यस्थी करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.