many people still not wear masks makes unnecessary crowd mask says cm uddhav thackeray | ...म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

...म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.

गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 'गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,' अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

...तर आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला पुढचा धोका

जनतेचे आभार मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी आज केलेल्या विधानाचा उल्लेख केली. 'दिवाळीत लोकांनी इतकी गर्दी केली की त्या गर्दीत कोरोना मरून जातो की काय असं वाटू लागलं, अशी भीती अजितदादांनी व्यक्त केली. अजितदादा तसं गमतीनं म्हणाले. पण गर्दीत कोरोना मरत नाही. तर तो वाढतो. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा,' असं आवाहन त्यांनी केलं.

सर्व उघडतो! जबाबदारी घेताय? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना थेट सवाल; म्हणाले...

नियम न पाळणाऱ्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 'अनेक जण मास्क लावत नाही. त्याचा वापर टाळतात. कोरोना संकट अजून गेलेलं नाही. त्यामुळे मास्क वापरा, असं माझं आवाहन आहे. कोरोनावरील लस अद्याप हाती आलेली नाही. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण त्रिसूत्री पाळायला हवी. वारंवार हात धुवायला हवेत. मास्क वापरायला हवा. फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला हवं,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या लाटेचा धोका सांगितला. 'दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे,' असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपल्यासाठी राबत आहेत. त्यांच्यावर आणखी किती ताण आणायचा हा प्रश्न आहे आणि हे आपल्या हाती आहे. अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घसरण सुरू होती. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्यांच्या तुलनेत कमी होती. मात्र दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १८ लाखांच्या जवळ
राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत ५० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला ८१ हजार ५१२ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: many people still not wear masks makes unnecessary crowd mask says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.