many congress ncp leaders will join shivsena in future says eknath shinde | विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात- एकनाथ शिंदे
विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात- एकनाथ शिंदे

नाशिक: काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपाची वाट धरत असताना विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी केला आहे. भविष्यात अनेक जण शिवसेनेत येतील, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षातील किती आणि कोणते आमदार शिवसेनेत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील, असा दावा भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला. 'विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. मात्र आता विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे अनेक जण याच आठवड्यात राजीनामा देतील,' असं पाटील यांनी म्हटलं होतं. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी नाशिकमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांवरही भाष्य केलं. पोलीस दलातून निवृत्त झालेले शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शर्मांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागेसंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असं शिंदेंनी सांगितलं. 


Web Title: many congress ncp leaders will join shivsena in future says eknath shinde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.