Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:24 IST2025-09-01T07:23:45+5:302025-09-01T07:24:33+5:30
Maratha Reservation: मराठा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर रविवारी दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. ‘बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक’ असे चित्र होते. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
लवकरच आम्ही त्यांच्याकडे अंतिम प्रस्ताव घेऊन जाऊ असे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चर्चेला रविवारी ब्रेक बसला असला तरी चर्चेची दारे उघडी असल्याचे स्पष्ट संकेत सरकारने दिले. उपसमितीचे सदस्य, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
आता पाणीही पिणार नाही: जरांगे पाटील
सरकारचा चर्चेचा घोळ पुरे झाला. तीन दिवस पाणी घेत होतो. मात्र, सोमवारपासून पाणीही बंद करून कडक उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सुप्रिया सुळेंना घेराव
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी भेट घेतली. मात्र, निघताना सुळे यांना आंदोलकांनी घेराव घालत त्यांच्या वाहनावर बाटल्या फेकल्या.