मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:27 IST2024-12-25T11:27:02+5:302024-12-25T11:27:24+5:30
Manoj Jarange Patil News: २५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करणार. हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”
Manoj Jarange Patil News: आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. कोणाचेही बाप येऊ द्यात, ते मॅटर मी दबू देणार नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाइलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
२५ जानेवारीपासून उपोषण सुरू करणार, आरक्षणासाठी लढा देणार
२५ जानेवारी २०२५ पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. मराठा आरक्षणासाठी लढा देणार आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचे आहे. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे, असे आदेश मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिले आहेत.
दरम्यान, माझे गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायच्या, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचे. २५ जानेवारी २०२५ ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, अशी सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही तेही पाहणार आहे, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. आहे.