Manoj Jarange Patil Mumbai Morcha: शिंदे समितीकडे आमच्या मागण्या नाहीत. आमच्या मागण्या राज्य सरकारकडे आहेत. शिंदे समितीवर आमची नाराजीच नाही. शिंदे समितीबाबत आमचे काही म्हणणे नाही. शिंदे समितीने ५८ लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आहे. आमचे काम हे शिंदे समितीपाशी गुंतले नाही तर आता सरकारपाशी आहे. कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे हा जीआर सरकार आता काढू शकते. शिंदे समितीने तातडीने हैदराबाद गॅजेटचा अहवाल देणे गरजेचे आहे, सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट याचाही अहवाल शिंदे समितीने सरकारला देणे गरजेचे आहे. आम्हाला शंका आहे की, शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडवणीस देऊ देत नाहीत, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
२९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. अनेक जिल्हे, तालुक्यात जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत. मराठा समाजाची ताकद मुंबईत दिसण्यासाठी आटापिटा करत आहेत. मुंबईकरांनी सांगावे, चूक सरकारची आहे का आमची? ५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. आता सरकारला काय पुरावा पाहिजे. आता प्रश्न आहे, आम्ही तुमचे का ऐकावे? आम्ही मुंबईत का येऊ नये? यांना वेळ द्यायचा तरी किती? आम्ही प्रत्येक वेळी वेळ दिला आहे. काय व्हायचे ते होऊ द्या, मी मुंबईमध्ये घुसणार. आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही, आमचे आम्हाला आरक्षण द्यावे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
समाजाच्या लेकरांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर...
ज्या दिवशी संयम आणि इमानदारीच्या यादीत येऊ, त्यावेळी मराठ्यांकडे कोणी वाकडे बघणार नाही. वेळ अजून हातातून गेलेली नाही. संधीचे सोने करा. सर्व पक्षातील लोकांना, आमदार, खासदार यांना विनंती करतो की, माझ्या लेकरांच्या पाठीवर हात ठेवा, सर्वांना आवाहन आहे आणि समाजाच्या लेकरांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, सर्व मंत्री आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, जो माझ्या समाजासाठी सभ्य वागतो मी त्यांच्यासोबत सभ्य वागतो. देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, लोकशाही मार्गाने मुंबईत येत आहे, २७ तारखेच्या आत मागण्या पूर्ण करा, एकदा अंतरवाली सोडली तर माघार नाही. कोण अडवते, तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. मराठ्यांनो यावेळेस शस्त्र उपसावे लागतेय लोकशाही मार्गाचे. त्याशिवाय पर्याय नाही, शस्त्र उपसावेच लागते आणि मुंबईत यावे लागते, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.