Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:50 IST2025-08-30T13:45:29+5:302025-08-30T13:50:53+5:30
Raj Thackeray on Maratha Reservation: मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी या सगळ्यांची उत्तरे एकच देऊ शकतात असं सांगत शिंदेंकडे बोट दाखवले.

Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
मुंबई - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत पोहचले आहे. आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उपोषण सुरू केले आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता एका वाक्यात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे. ठाणे येथील मनसे पदाधिकारी मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईतील मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजही आरक्षणासाठी एकवटणार असल्याचं दिसून येत आहे. त्याकडे तुम्ही कसे पाहता यावर राज ठाकरे म्हणाले की, मला वाटते, या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. शिंदे जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. यावर एकनाथ शिंदेंच उत्तर देऊ शकतात. मुंबईकरांना जर त्रास होत असेल तर त्याचे उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते मागील वेळी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवून आले होते, मग ते मुंबईत का आले यावर शिंदेंच उत्तर देतील. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही एकनाथ शिंदे यांना विचारा असं त्यांनी म्हटलं.
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा"
मुंबईत जरांगे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरूण वर्गही कालपासून मुंबईत आला आहे. पण त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रशासनावर प्रचंड टीका केली जात आहे. तशातच, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाच्या आवारात असलेल्या मराठा आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवा. तुम्हाला जेवायला मिळू नये, पाणी मिळू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या पालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. आयुक्त साहेब, तुम्हीही सेवानिवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला सुट्टी मिळू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांगेंकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बुमरँग होणार आहे. व्यक्तिगत दोषापोटी शरद पवारांनी हा बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडला आहे. परंतु निश्चित हे बुमरँग होणार असून त्यातून समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहचवणारा आहे. त्यामुळे निश्चित याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगेंसारखे सुसाईड बॉम्ब या महाराष्ट्रात वापरतात. हे दुर्दैव आहे असं भाजपा आमदार संजय केनेकर यांनी म्हणत जरांगेंच्या आंदोलनावर टीका केली.