मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली. या उपोषणासाठी बुधवारी सकाळी त्यांनी आंतरवली सराटी येथून गणेशपूजा करून प्रस्थान केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "फडणवीस यांनी मराठा समाजाला फसवलं आहे. त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही", असाही त्यांनी इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्या आणि समाजाच्या योगदानाचा आदर करायला हवा. फडणवीस मुंबईत कोणत्याही आंदोलकाला आझाद मैदानावर जाण्यापासून रोखणार नाहीत आणि गरिबांच्या वेदनेचा आदर करतील, अशी आम्हाला आशा आहे."
"...तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल"
"आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देणे ही मराठा समाजाची चेष्टा आहे. फडणवीस यांना सगळ्या महाराष्ट्रासमोर हे सिद्ध करायचे होते की, त्यांनीच आंदोलनाला परवानगी दिली. त्यांनी मोठे मन दाखवायला हवे होते. महायुतीचे सरकार मराठ्यांच्या मतांवरच आले आहे. मी वारंवार सांगितले आहे, आजही तेच सांगत आहे... तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली तर, येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
"फडणवीसांनी संधीचे सोने करावे"
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, "फडणवीसांकडे योग्य संधी आहे आणि त्यांनी संधीचे सोने करावे. राठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. मराठे मरेपर्यंत आम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही हा आमचा शब्द आहे."